आयुष्यात एखादी सकारात्मक घटना व्हायची असेल तर ती चुकत नाही, त्याचबरोबर नकारात्मक घटना सुद्धा चुकत नाही, हे असे का वाटते ? तर आज मी आपणास एक घटना सांगणार आहे. संपूर्ण घटना शेवटपर्यंत वाचा आपणास नक्की कळेल.
मे महिन्यातील 15 तारीख होती. रात्रीचे दोन वाजले असावेत,पंधरा तारखेचा सोमवार होता.मध्यरात्रीचा मंगळवार असावा. आम्हाला नाशिकहून आमच्या मूळ गावी सांगली जिल्ह्यातील शिंगणापूर येथे जायचे होते. त्यासाठी आमच्या कुटुंबातील सदस्य रात्री दोन वाजता तयारीसाठी उठलेले होते. आमचा विचार असा होता की उन्हाळा खूप कडक आहे,त्यामुळे शक्यतो पहाटे लवकर निघावे.लवकर निघाल्यास उन्हाळ्याचा त्रास ही कमी होईल आणि अंतर जास्त कापले गेल्याने मध्येच कुठेतरी थांबून विश्रांती घेता येईल. तेवढेच आमच्या गाडीच्या इंजिनला सुद्धा विश्रांती मिळेल या विचाराने आम्ही पहाटे लवकर निघायचे ठरवलेले होते. A virtual friend since 18 years met because of a mistake on Google Maps

आंघोळ करून सर्व आवरून आम्ही पहाटे साडेतीन वाजता नाशिक सोडले. मी एकटाच ड्रायव्हिंग करत असल्याने गाडी माझ्या ताब्यात असल्याने,माझा मोबाईल मात्र माझा चिरंजीव अमरच्या ताब्यात होता. पहाटे आपण कोठे आहोत हे पाहण्यासाठी गुगल मॅप तो चेक करत होता. गाडीमध्ये चर्चेदरम्यान ठरले की आमचे कुलदैवत म्हसवड सिद्धनाथ आहे,या ठिकाणी आपण गेले पाहिजे,आपण प्रत्येक वेळी जवळून जातो पण जाणे होत नाही. यावेळी आपण म्हसवडमधील सिद्धनाथचे दर्शन घेऊन गावी जाऊ असा सूर आमच्या श्रीमतींचा होता.
मग मला सहमत होणे भाग पडले. त्याप्रमाणे आम्ही नियोजन करायचे ठरवले. म्हसवड ला जायचे म्हंटल्यावर तिथेच मुक्काम होणार हे आम्हाला कळून चुकले होते कारण तिथून गावी जायचे म्हंटल्यावर रात्र होणार होती आणि पुढील रस्ता हा अनोळखी होता.गेलोही असतो परंतु दिवसभरच्या प्रवासाने फार थकून गेलेलो होतो. म्हणुन मुक्काम करून देवाचा विधी आणि दर्शन करून आम्ही दुसऱ्या दिवशी निघायचे असे ठरवले होते. A virtual friend since 18 years met because of a mistake on Google Maps
असा विचार करून आम्ही निघालो.दुपारी बाराच्या दरम्यान आम्ही पुण्याच्या जवळ असणा-या पुणे-बंगलोर हायवे वर कापूरहोळ फाट्यावर आलो.तिथून प्रति बालाजी या ठिकाणी दर्शनासाठी आलो. दर्शन करून सुमारे दोन वाजता सातारा येथे पोहोचलो. इथून पुढे आम्हाला म्हसवड चा रस्ता माहित नव्हता. म्हसवड हे सातारा जिल्ह्यातील माणदेश भागात आहे. तिथून मी अमरला म्हसवड सिद्धनाथ चे लोकेशन लाव असे सांगितले. काही वेळाने मी त्याला विचारले सुद्धा लोकेशन लावले का ? असे .
तर अमरने लावले असे सांगितले. अंतर विचारले तर अंतर ही सांगितले. माझी खात्री झाली की अमर ने लोकेशन सेट केले आहे. या काळात मी त्याच्याकडून मोबाईल कधीही घेतला नव्हता. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने गाडीत एसी जरी चालू केला असला तरी तो कधीकधी खूपच थंड वाटायचा,नंतर कमी करावा लागायचा . मध्येच कुठेतरी थकवा जाणवु लागला की रस्त्याकडेला थांबून रसवंती गृहात जाऊन उसाच्या रसाचा एक-एक ग्लास पिण्यावाचून पर्याय नसायचा. परत गाडी चालू व्हायची. गुगल मॅप वरील अंतर खूप वाटत होते पण वाटायचे असेल जास्त कोणी सांगावे ? कधी कधी पक्का डांबरी रस्ता लागायचा, तर कधीकधी कच्चा रस्ता. A virtual friend since 18 years met because of a mistake on Google Maps
हे थोडे वेगळेच वाटत होते. सरते शेवटी जांभळ्या देत,बसत,उतरत,कंटाळत लावलेले लोकेशन जवळ असल्याचे अमरने सांगितले. माझ्या मनात शंका आली की या भागात आपण कधी आलो नाही हे कसले म्हसवड ! कारण या अगोदर म्हसवडला मी तीन-चार वेळा येऊन गेलेलो होतो, पण ते या मार्गाने आलेलो नव्हतो. मनात पाल चुकचुकली. त्या गावात गेल्यानंतर कळले की या ठिकाणी एक सिद्धनाथ मंदिर आहे. पण हे गाव म्हसवड नाही या गावाचे नाव आहे भुड. आता हे भुड आणि सिद्धनाथ मंदिर याचा ताळमेळ कसा लागला याबाबत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे.
अमरने म्हसवड सिद्धनाथ मंदिर असे लोकेशन गुगल मॅप वर सेट केल्याने या लोकेशन च्या पुढे भुड हे गाव आहे हे त्याने लोकेशन लावताना लक्षच दिले नव्हते म्हणून आम्ही म्हसवड सिद्धनाथ मंदिर भुड मध्ये पोहोचलो होतो. तिथे गावात चौकशी केल्यावर कळले की सिद्धनाथ मंदिर तर या भागात एकच नाही. ते भुड,खरसुंडी,म्हसवड या तिन्ही ठिकाणी आहे. मला मनातून देवाचा खूपच राग आलेला होता,पण रागवून,वैतागून काही उपयोग नव्हता. मी अमरला सिद्धनाथ मंदिर म्हटल्यानंतर त्याने फक्त सिद्धनाथ मंदिर इतकेच लक्षात ठेवले होते पुढचे लक्षात ठेवणे अमरला गरजेचे वाटले नसावे.आणि त्यालाही माहित नव्हते की या भागात सिद्धनाथ मंदिर एका पेक्षा जास्त आहेत.
त्यामुळे आम्ही भलत्याच गावात येऊन पोहोचलो होतो. साधारणपणे संध्याकाळची चार-पाच ची वेळ असावी. एक मात्र समजत नव्हते एकाच नावाचे देव तीन-तीन ठिकाणी कसे स्थापन केले असावेत ? याचे उत्तर मिळत नव्हते. आणि भक्तगण सुद्धा प्रत्येक देवस्थानचे वेगवेगळे आहेत हे आमच्या वरूनच आम्हाला समजत होते. कारण आम्ही म्हसवडच्या सिद्धनाथलाच मानणारे आहोत. मग तिथून गुगल मॅप वर म्हसवड असे लोकेशन सेट केल्यावर अंतर 45 किलोमीटरचे दिसू लागले.रुक्ष,कोरडा परिसर वाटत होता. म्हसवडच्या दिशेने वेगाने निघण्याच्या बेताने गाडी सुरू केली पण रस्ता पाहिजे तितका बरा नव्हता. त्यामुळे स्वतःला व गाडीला जपत आम्ही भक्तगण निघालो. असे म्हणता म्हणता खरसुंडी जवळ आलो.आम्हाला खरसुंडीचा सिद्धनाथ ही नको होता. त्यामुळे तिथेही थांबण्याचा योग आला नाही. मग आम्ही खरसुंडी पासून चिंचाळेपासून झरे रोडवरून जात होतो, हे आज संपूर्ण माहिती झाली म्हणून मी या ठिकाणी लिहीत आहे. या अगोदर या भागाची शून्य कल्पना होती.
एक वळण घेऊन सरळ रस्त्याला लागलो तर तिथे दोन रस्ते मिळालेले होते. ते रस्ते इंग्रजी अक्षरातल्या T प्रमाणे दिसत होते. त्या T च्या काखेत एक बोर्ड दिसला. त्यावर लिहिले होते R.K. मंगल कार्यालय. पुढे काय लिहिलेले होते आठवत नाही. हा बोर्ड वाचून मला आश्चर्यचा धक्का बसला. आपण चुकून ऑनलाइन जगातील मित्र विजयराज शिंगाडे यांच्या गावाजवळून जात असावे हे लगेच लक्षात आले.ज्या मित्राला मी आज पर्यंत ऑनलाईनच बोलत होतो. ओळख होऊन जवळजवळ 18 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला असावा. माझ्या डोळ्यासमोर विजयराज शिंगाडे यांचा चेहरा आला. जो केवळ व्हिडिओ आणि व्हाट्सअप च्या डीपी वर पाहिलेला होता. आमची ओळख झालेली होती त्यावेळी सोशल मीडिया ॲप Nimbuz अतिशय लोकप्रिय होते. ज्यावेळी लिंबूज लोकप्रिय होते त्यावेळी फेसबुक बाल्यावस्थेत होते. बाकीच्या सोशल मीडियाचा जन्म ही झाला नव्हता.त्यावेळी जगभरातील लोकांच्या गर्दीत विजयराज शिंगाडे मला त्या आभासी दुनियेत भेटले होते, नंतर फेसबुकचे मित्र झाले.त्यानंतर व्हाट्सअप चे.त्यानंतर प्रत्यक्ष फोन अशी आमची मैत्री ! त्यांच्याकडून कळालेले होते की, त्यांचे बंधू गावी असत्तात आणि गावाकडचे सर्व व्यवस्थापन ते बघतात.
आत्ताचा रस्ता मात्र पक्का डांबरी आणि सुसाट जाण्यायोग्य होता. आम्ही ठरवले की आर के मंगल कार्यालय जर रस्त्यात आढळल्यास,तर नक्की भेट द्यायची. मंगल कार्यालयात त्यांचे बंधू असतील तरीसुद्धा. त्या टी आकाराच्या फाट्यापासून आम्ही पाच दहा मिनिटे पुढे प्रवास केला असेल,रस्त्याच्या उजव्या बाजूला भव्य असे मंगल कार्यालय आम्हाला दिसू लागले.तो झरे रोड होता. मी गाडीतून उतरलो. आणि फक्त मंगल कार्यालयाकडे एक मिनिटभर पाहतच राहीलो. आजवर फेसबुक वर पाहिलेले मंगल कार्यालय मी प्रत्यक्ष पाहत होतो. मी आमच्या कुटुंबीयांना सांगून मंगल कार्यालयाच्या दिशेने निघालो.
रस्त्याच्या कडेला योग्य अंतर सोडून मंगल कार्यालयाची भव्य वास्तू उभारण्यात आलेली होती. मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या भिंती खूपच मजबूत दिसल्या. प्रवेशद्वाराला गेल्यानंतर आत शांतता जाणवली. तिथे कोणीही दिसत नव्हते. मला सुद्धा आत जाण्यामध्ये थोडासा संकोच वाटत होता,कारण विजयराज शिंगाडे यांच्या बंधूंची माझ्याशी ओळख नव्हती. आता आलोच आहे तर जे होईल ते होईल म्हणून मी पुढे पुढे जात होतो. मंगल कार्यालयाच्या मुख्य हॉलच्या दरवाजाजवळ मी पोहोचलो होतो.आत इतकी स्वच्छता होती की मला चप्पल घालून आत जावेसे वाटले नाही. मी चप्पल तिथेच काढले. आणि आत गेलो. तर दुरून एक व्यक्ती मला मंगल कार्यालयाच्या मुख्य स्टेजवर बसलेली दिसली. पण त्या व्यक्तीचे माझ्याकडे लक्ष नव्हते. ती व्यक्ती आपल्याच विचारात मोबाईल पाहत असलेली,मोबाईल मध्ये काहीतरी पहात,मान खाली घातलेली जाणवली.मी पाय आपटण्याचा सुद्धा थोडासा आवाज गेला तरी पण ती व्यक्ती वर पाहत नव्हती. मी विचार केला की हे विजयराज यांचे बंधूच असतील.
मग मी थोडे दचकतच विचारले
“काय ओ, तुम्ही विजयराज शिंगाडे यांचे भाऊ आहात का ?”
तितक्यात त्या व्यक्तीने वर पाहिले आणि माझ्याकडे बघून म्हणाली
“नामदेव सर तुम्ही ?”
विजयराजने माझे नाव घेतल्यानंतर प्रत्यक्ष तेव्हा मला कळाले की विजयराज स्वतः आहे. नाहीतर मला अजून त्यांचे बंधूच असावेत असे वाटत होते. कारण पहिलीच भेट होती,आणि त्याचे बंधू व त्यांच्यामध्ये काहीसा सारखेपणा वाटत होता. आता फोटोत पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे यामध्ये फरक असतोच. शिवाय विजयराज राजस्थानला असतात गावाकडे कधीतरी येतात हे मला माहीत होते.
मग आम्ही इकडे येण्याचे कारण काय, आणि कसे चुकून इकडे आलो हे सगळे सांगितले. आम्हाला पुढचे अंतर कापायचे होते पण त्यांनी आम्हाला त्यांच्या बंगल्यावर येण्याविषयी आग्रह केला. त्यानुसार आम्ही त्यांच्या बंगल्यावर गेलो त्यांनी आमचा योग्य पाहुणचार केला. त्यांच्या बंधूंची ओळख झाली. त्यांच्या बंगल्याच्या परिसरात शिंगाडे बंधूंनी त्यांच्या वडिलांचे मंदिर बांधले आहे. ही गोष्ट मला खूप आवडली. ही भावना वडीलाविषयी अपार प्रेम,श्रद्धा व्यक्त करणारी वाटली.त्यांनी आम्हाला म्हसवडला राहण्यापेक्षा येथे आमच्या घरी रहा किंवा मंगल कार्यालयाला लागूनच लॉजिंग आहे तिथे रहा असे सांगितले.
आम्ही रात्री आर के मंगल कार्यालय येथे परत येतो म्हणून म्हसवडला निघालो. एका तासात म्हसवडला पोहोचलो. देवाचे दर्शन आणि विधी करून परत शिंगाडे बंधूंच्या मंगल कार्यालया कडे निघालो. तिथे आमची जेवणाची व झोपण्याची उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली होती. दिवसभर थकलेलो होतो पण अशी भव्य दिव्य वास्तू पाहून मन प्रसन्न झाले होते. या गोष्टीचा अभिमान सुद्धा वाटला की, शिंगाडे बंधू इतके श्रीमंत व्यक्ती आहेत पण कधी बोलण्यातून अठरा वर्षात कधीच जाणवलं नव्हतं.
हे फक्त त्यांच्या गावाकडचे आहे पण इतर आणि राजस्थानचे वैभव सुद्धा बरेच असावे असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते. त्या रात्री खूप थकल्यामुळे जास्त काही गप्पा झाल्या नाहीत पण सकाळी त्यांनी आर के मंगल कार्यालय बांधण्या मागची प्रेरणा ते ही वास्तू पूर्ण होईपर्यंत संपूर्ण माहिती आम्हाला सांगितली. मंगल कार्यालयाचा कोपरा आणि कोपरा आम्हाला दाखवला. मंगल कार्यालय बांधून एखादेच वर्षे झाले असावे. अगोदरच्या दिवशी लग्नकार्य पार पडून सुद्धा मंगल कार्यालयाची व लॉजिंगची स्वच्छता उल्लेखनीय होती. मला मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाचे कौतुक वाटले.
एखाद्याच्या घरचे लग्न कार्य म्हटलं की किती धावपळ असते याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे त्यांचे बंधू व वहिनी व्यवस्थापनाचे काम बघतात हे त्यांच्याकडून मला समजले.
सकाळी सगळेजण फ्रेश झालो.खूप काही गप्पागोष्टी झाल्या, नाश्ता झाला. आर के मंगल कार्यालय हे नाव त्यांच्या बंधूंच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे हे आम्हाला कळाले. त्या परिसरामध्ये इतके आल्हादायक वातावरण होते की तिथून निघावे असे वाटत नव्हते आणि आम्हाला सुद्धा कोणतीही घाई नव्हती,पण विजयराज यांना काम असल्याचे आमच्या नजरेतून सुटले नाही, तेव्हा सकाळी दहाच्या दरम्यान आम्ही आमच्या मूळ गावी शिंगणापूर साठी मार्गस्थ झालो.
शिंगाडे बंधुंनी आपल्या प्रगतीचा आलेख खूपच उंचावर नेला आहे यात शंका नाही. तिघे बंधू एकोप्याने राहतात, प्रेमाने राहतात, म्हणून तर इतके वैभव आहे असे वाटल्यावाचून सुद्धा मला राहवले नाही. एखाद्या वाट चुकलेल्या वाटसराला सुद्धा मदत करण्याची वृत्ती,औदार्य,विशाल मन शिंगाडे बंधू मध्ये आहे,हे मला दिसले. मी त्यांचे आभार मानले नाही, कारण आभार परक्यांचे मानायचे असतात,मला परकेपणा वाटला नाही म्हणून मी आभार सुद्धा मानले नाहीत. परमेश्वराची लीला आपल्याला सुद्धा कळत नाही. सिद्धनाथ भुड मध्ये मी देवावर रागावलेलो होतो. कारण त्याने आमचा रस्ता चुकवलेला होता. पण विजयराज आणि त्यांच्या परिवार ला भेटल्यानंतर असे वाटले की आम्हाला इथे आणण्यासाठी सिद्धनाथनी मुद्दाम रस्ता चुकवलेला होता.आयुष्यात नेहमी अशा चुका होत राहोत आणि अशी माणसे भेटत राहोत असा विचार करत गावी पोहचलो.
शब्दांकन :
नामदेव जानकर,नाशिक

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680