मित्रांनो “सुट्टी” या शब्दाभोवती समाजातील काही घटकांचा आनंद फेऱ्या मारत असतो. सुट्ट्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही कमी कालावधीच्या सुट्ट्या असतात तर काही दीर्घ कालावधीच्या सुट्ट्या असतात.
दीर्घकालाच्या सुट्ट्यांमध्ये मे महिन्याच्या सुट्टीचा समावेश होतो. या सुट्ट्यांचा उपयोग पालक आणि मुलांना होतो. बरेच वेळा सुट्टया येतात आणि निघून जातात पण त्या सुट्ट्यांचा कोणताही उपयोग होत नाही. शैक्षणिक वर्ष संपल्यावर 1 मे पासून शाळांना सुट्ट्या लागतात आणि मुलांना सुट्टी मिळाल्यामुळे पालक ही काहीसे बिनधास्त राहतात,पण या सुट्ट्यांचा योग्य उपयोग केला तर पालकांसाठीही फायदा आहे आणि मुलांसाठी फायदा आहे. मुलांना सुट्टी असल्यामुळे पालक ही त्यांच्या व्यवसायातून, नोकरीतून याचवेळी सुट्ट्या काढत असतात.
तर या सुट्टीच्या कालावधीचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे हे आज आपण या लेखात पाहणार आहोत.
1. परगावच्या नातेवाईकांना भेटी
मे महिन्यातील सुट्ट्या या दीर्घ सुट्ट्या असल्याने दूरच्या नातेवाईकाच्या गावाला मुलांना सोडले पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये नात्याबद्दल आदर,आपुलकी वाढीस लागण्याची शक्यता असते.आई वडीलाशिवाय इतरांशी संबंध आल्याने त्यांच्या स्वभावाची ओळख होईल,त्यांच्यात सुसंवाद वाढेल परिणामी नातेसंबंध चांगले राहतील आणि मुलांना सुद्धा नावीन्य वाटेल. त्याचबरोबर विविध ऐतिहासिक किल्ले, ऐतिहासिक वास्तू, महापुरुषांची जन्मगावे यांना सुद्धा मुलांनी पालकासह भेट देणे आवश्यक आहे.
2. छंदांच्या शिकवण्यामध्ये सहभाग
मे महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत मुलांना विविध छंदांच्या शिकवण्या लावल्या पाहिजेत. प्रत्येकाला एक तरी छंद असावाच. छंदामुळे आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी मध्ये अडकून राहता येते,त्यामुळे अनावश्यक गोष्टी आपोआपच टाळल्या जातात. उदाहरणार्थ विविध मेंहदी क्लासेस, पोहायला शिकणे, इंग्लिश स्पीकिंग कोर्स, काही अभ्यासक्रमाचे ऍडव्हान्स क्लासेस सुद्धा आहेत.
3. उन्हाळी खाद्यपदार्थ बनवणे.
सर्वसाधारणपणे मे महिना हा उन्हाचा असल्याने वर्षभरासाठी लागणारे खाद्यपदार्थ या उन्हाळ्यात बनवले जातात. यासाठी सुद्धा या सुट्टीच्या कालावधीचा पालकांना उपयोग करून घेता येतो.उन्हाळी खाद्य पदार्थांमध्ये पापड,कुराड्या,शेवया यांचा समावेश होतो. मे महिना आंब्यांचा ऋतु असल्यामुळे लोणचे सुद्धा याच काळात बनवण्यात येते.यासाठी या कामासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीतील काही काळ राखून ठेवला पाहिजे.
4. पावसाळापूर्व कामे करून घेणे.
मे नंतर पावसाळा सुरू होणार असल्याने पावसाळ्यापूर्वीची काही कामे करणे आवश्यक असते. उदा. आपण जर शेतकरी असाल तर नांगरणी करणे आवश्यक आहे. विहिरीचा काळ काढणे आवश्यक आहे आणि जर सामान्य व्यक्ती असाल तर घरांना रंग देण्याचे काम ही उन्हाळ्यातच केले पाहिजे. नवीन बांधकाम असेल तर उन्हाळ्यात रंग देणे कधीही चांगले.
5. नवीन विहीर तयार करणे किंवा नवीन बोरवेल बनवणे.
उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी ही खूप खाली गेलेली असते. त्यामुळे विहीर तयार करण्यासाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा असतो, त्याचबरोबर पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे बोरवेल तयार करणे सुद्धा सोपे जाते.
अशाप्रकारे मे च्या सुट्टीच्या कालावधीचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. प्रत्येक व्यक्तीने ही कामे करणे गरजेचे आहेच असे नाही पण यातील एखादे काम तरी आपल्या सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पुरेशे होऊन जात असते.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680